३ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; हरसूल पोलिसांची कारवाई
नाशिक प्रतिनिधी
महिला बचत गटाचे पैसे गोळा करणाऱ्या ए. यू. फायनान्स, नाशिक येथील कर्मचाऱ्यावर मिरचीपूड फेकून रोख रक्कम व टॅब लुटणाऱ्या तिघांना हरसूल पोलिसांनी अटक करत ३ लाख ६३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. ५ जून २०२६ रोजी दुपारच्या सुमारास ए. यू. फायनान्सचा कर्मचारी नवनाथ चंदर मोरे (रा. रासेगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक) हे महिला बचत गटाचे पैसे संकलित करून जात असताना हरसूल परिसरातील लाडची-पारधीपाडा रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून त्यांच्याकडील ८४ हजार ८८० रुपये रोख रक्कम तसेच सॅमसंग कंपनीचा हिशेब ठेवण्यासाठी वापरला जाणारा टॅब लुटून नेला होता. या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण यांच्या मदतीने विशेष पथक तयार करण्यात आले. गुप्त बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे अशी आहेत. योगेश लहानू फसाळे (वय २०, रा. लाडची), जयराम महावू पारधी (वय २९, रा. पारधीपाडा, लाडची) आणि सोपान हरी पारधी (वय २२, रा. पारधीपाडा, लाडची). चौकशीत संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील ८४ हजार ८८० रुपये रोख रक्कम, सॅमसंग टॅब्लेट (किंमत ४ हजार रुपये), फिर्यादीची बॅग व कागदपत्रे, गुन्ह्यात वापरलेली यामाहा आर-१५ दुचाकी (किंमत २ लाख १५ हजार रुपये) तसेच तीन मोबाइल फोन (एकूण किंमत ६० हजार रुपये) असा एकूण ३ लाख ६३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलीस ठाण्याचे सपोनि जीवन बोरसे व त्यांच्या पथकाने तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली.
