28.4 C
Nashik
Wednesday, July 15, 2026

मालेगावात मध्यरात्री ‘अघोरी’ थरार! फार्म हाऊसवर ‘त्या’ गुप्त पूजेने खळबळ; ७ जणांना बेड्या

मालेगाव प्रतिनिधी

मालेगाव तालुक्यातून जादूटोणा आणि अघोरी पूजेचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंगसे येथील एका फार्म हाऊसवर मध्यरात्रीच्या सुमारास सुरू असलेल्या अघोरी पूजेच्या ठिकाणी तालुका पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी पूजेचे साहित्य जप्त करत ७ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मुंगसे शिवारातील एका व्यापाऱ्याच्या फार्म हाऊसवर रात्रीच्या अंधारात काही जण एकत्र जमून जादूटोणा करत असल्याची गुप्त माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास फार्म हाऊसवरील सालदाराच्या घरात अचानक छापा टाकला. पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा तिथे अघोरी पूजेची मांडणी करण्यात आली होती. पूजेच्या अवतीभोवती काही जण बसलेले पोलिसांना आढळले. पोलिसांची चाहूल लागताच तिथे उपस्थित असलेल्या संशयीतांमध्ये एकच पळापळ झाली. अंधाराचा फायदा घेऊन त्यातील एक जण घटनास्थळावरून फरार झाला.

लिंबू, काळा धागा अन्…

पोलिसांनी केलेल्या छाप्यात घटनास्थळावरून जादूटोण्यासाठी वापरले जाणारे अघोरी साहित्य जप्त केले आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रामुख्याने लिंबू, काळा धागा, काळे धान्य व पूजेच्या इतर साहित्याचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात एकूण १० जणांचा समावेश असून, त्यापैकी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. एका महिलेसह दुसऱ्या संशयीताला पोलिसांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. तर मुख्य ‘भगत’ असलेला अबिद महाराज हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गुन्ह्यातील संशयीत

योगेश देवरे (रा. मालेगाव), रऊफ इब्राहिम शेख (रा. द्याने, मालेगाव), अरुण इंगळे (साकुरी, ता. मालेगाव), सुखदेव मोरे (मुंगसे), साहेबराव निकम (पिंप्राळे, ता. नांदगाव), महादेव रायते (मालेगाव), राजेंद्र लोले (मंचर, पुणे), वृषभ चव्हाण (भोसरी, पुणे), अबिद महाराज आणि ललिता केदार रा. नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत.

‘पैशांचा पाऊस’ पाडण्यासाठी होती पूजा?

हा अघोरी पूजेचा घाट नेमका कशासाठी घालण्यात आला होता, याचा अधिकृत उलगडा अद्याप झालेला नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याच्या किंवा गुप्तधनाच्या हव्यासापोटी हा सर्व प्रकार सुरू असावा, असा प्रथमदर्शनी संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार हेमंत देवरे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles