28.4 C
Nashik
Wednesday, July 15, 2026

चेन स्नॅचिंग करणारी सराईत टोळी जेरबंद

दहा गुन्हे उघड, ४.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक प्रतिनिधी

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पसार होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. परिणामी या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने निफाड परिसरात राबविलेल्या धाडसी कारवाईत सराईत चेन स्नॅचिंग टोळीला जेरबंद करत जिल्ह्यातील दहा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चेन स्नॅचिंग प्रवण भागात गस्त, नाकाबंदी व विशेष तपास मोहीम सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे निफाड चौफुली परिसरात सिनेस्टाइल पाठलाग करून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केल्यानंतर आणखी दोन संशयिताना अटक केली. अटक केलेल्या संशयितांमध्ये विशाल पोपट सांगळे (रा. सातपूर, नाशिक), गणेश ऊर्फ कुलदीप मनोहर कापसे (रा. पेठ रोड, नाशिक), रोहित केशव गायकवाड (रा. भाऊनगर, पिंपळगाव बसवंत) आणि विनय पांडुरंग उज्जैनकर (रा. अश्वमेधनगर, नाशिक) यांचा समावेश आहे. चौकशीत संशयितांनी सायखेडा, निफाड, दिंडोरी, पिंपळगाव बसवंत, ओझर, वावी आणि लासलगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिलांचे सोन्याचे दागिने जबरीने हिसकावल्याची कबुली दिली. या टोळीने चोरी केलेले दागिने विनय उज्जैनकर याला विकल्याचेही निष्पन्न झाले. या कारवाईत पोलिसांनी ४८ ग्रॅम सोन्याची लगड, गुन्ह्यात वापरलेली यामाहा मोटारसायकल, मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी तपास सुरू आहे. तपासादरम्यान सायखेडा, निफाड, दिंडोरी, पिंपळगाव बसवंत, ओझर, वावी आणि लासलगाव पोलीस ठाण्यांतील दहा चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील चेन स्नॅचिंगच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होईल. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles