27.6 C
Nashik
Wednesday, July 15, 2026

नाशिक जिल्ह्यात शासकीय अधिकारीही असुरक्षित, नायब तहसीलदारास खाली पाडून मारहाण

नाशिक प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात भूमाफिया, अवैधरित्या मुरुम उत्खनन करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. काही ठिकाणी असे प्रकार रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून प्रयत्न केले जातात. तर, अनेक ठिकाणी यासंदर्भातील तक्रारींकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे या माफियांची मुजोरी एवढी वाढते की, एखादा अधिकारी कारवाईसाठी पुढे सरसावल्यानंतर थेट त्याच्या पदाची पर्वा न करता त्याच्यावर हात उचलला जातो. अशीच एक घटना येवला तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेलाच हादरा बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला तालुक्यातील पारेगाव या गावाजवळ एक तळे आहे. या तळ्यातून काही माफियांकडून अवैधपणे मुरूम उत्खनन करण्यात येत होते. या मुरुम उत्खननाच्या वाहतूक संदर्भात प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर त्वरीत दखल घेण्यात आली. निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना तहसीलदार आबा महाजन यांनी पारेगाव येथील तळ्यातून अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याने कारवाई करण्यासंदर्भात सूचना केली. त्यानुसार नायब तहसीलदार पंकज नेवसे हे ग्राम महसूल अधिकारी संतोष आठवले आणि वैभव भड यांच्यासह शनिवारी दुपारी पारेगावात पोहचले. गावाजवळील तळ्याच्या परिसरात त्यांना मुरूमाने भरलेला डंपर आढळून आला. त्यामुळे नायब तहसीलदार नेवसे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या राहुल आहेर आणि शुभम परदेशी यांच्याकडे उत्खननासंदर्भात काही परवाना आहे काय, याची विचारकणा केली. परंतु, त्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत, असे तक्रारीत म्हटले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सहकार्य न करता राहुल आहेर आणि शुभम परदेशी या दोघांनी महसूल पथकाशी अरेरावीची भाषा केली. वाद घातला. राहुल आहेरने नायब तहसीलदार नेवसे यांना मारहाण केली. त्यांना खाली पाडले. नेवसे यांचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात नेवसे यांना दुखापत झाली. राहुल आहेर आणि शुभम परदेशी या दोघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून धमकी दिल्याचे पोलिसांकडे दाखल तक्रारीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे, पोलीस अधिकारी उपस्थित झाल्यानंतरही संशयितांकडून शिवीगाळ करण्यात येत होती, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोली उप निरीक्षक सागर कोते करीत आहेत. दरम्यान, संबधित प्रकाराने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी संबंधितांविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles