नाशिक प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी खासदार भास्कर भगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नाशिक जिल्ह्यात मे महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष, भात, सोयाबीन, भुईमूग, मका, कांदा, टोमॅटो, डाळिंब या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकर्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन शेतकर्यांना तातडीची मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. काही ठिकाणी पिके पूर्णपणे नष्ट झाली असून शेतकर्यांकडे पुन्हा पीक घेण्याचे साधन नाही. शेतकर्यांनी कर्ज काढून, मोठा खर्च करून घेतलेली शेती पावसाने उद्ध्वस्त झाल्याने आत्मनिर्भर शेतकरी आज आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच पावसामुळे जनावरांचे चारा आणि निवार्याचे देखील मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी, तसेच बियाणे, खत, कर्जमाफी आणि पुनर्वसन यासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा. शेतकर्यांची अवस्था दयनीय असून शासनाने त्वरीत मदत न दिल्यास आत्महत्यांचे प्रमाण वाढू शकते. म्हणूनच प्रशासनाने युद्धपातळीवर सर्वेक्षण करून शेतकर्यांना दिलासा द्यावा. मे महिन्यापासून सातत्याने पडणार्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी खासदार भगरे यांनी मुख्यमंत्री फडवणीस यांच्याकडे केली आहे.
