27.6 C
Nashik
Wednesday, July 15, 2026

तुकाराम मुंढेंची कारवाई अन् ‘एफडीए’ची कमाई…

 अधिकाऱ्यांची पावसाळ्यात दिवाळी; तपासणी की तडजोड?

नाशिक प्रतिनिधी

राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लाऊड किचन्स तसेच विविध अन्न सेवा आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षेचे निकष अधिक कठोर करण्याच्या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश जारी केला आहे. या आदेशामुळे ग्राहकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला असून, राज्यभरातील सर्व अन्न व्यावसायिकांना नव्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धाक दाखवून संबंधित यंत्रणेकडून वसुलीची मोहीम सुरू असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन आदेशानुसार ग्राहकांना संपूर्ण सुरक्षित पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले असून, बाटलीबंद पाणी खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. अन्न पदार्थ वर्तमानपत्रात किंवा शाईयुक्त कागदात देण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी केवळ फूड-ग्रेड पॅकेजिंगचा वापर करावा लागणार आहे. तसेच अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी, फॉस्टॅक प्रशिक्षण, स्वच्छतेचे निकष, वापरलेल्या खाद्यतेलाच्या पुनर्वापरावर कठोर निर्बंध तसेच मेनू कार्डवर कॅलरी, अॅलर्जन आणि शाकाहारी-मांसाहारी अशी स्पष्ट माहिती देणेही अनिवार्य करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी राज्यभर तपासणी मोहिमेलाही वेग देण्यात आल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षित अन्न हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याची भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे.

कारवाईच्या धाकाने वसुलीचे आरोप

मात्र, अन्न व औषध प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काही हॉटेल, रेस्टॉरंट चालक आणि दूध डेअरी व्यावसायिकांकडून गंभीर तक्रारी समोर येत आहेत. कारवाईचा धाक दाखवून अन्न व औषध प्रशासनाचे काही अधिकारी किंवा संबंधित यंत्रणेतील कर्मचाऱ्यांकडून १५ ते २० हजार रुपयांची मागणी सर्रासपणे केली जात असल्याचा आरोप काही व्यावसायिकांनी केला आहे. तपासणीत त्रुटी आढळल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो, अशी भीती दाखवून तडजोड करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचेही व्यावसायिकांमध्ये सांगण्यात येत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने दबाव

काही व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात कारवाईची भीती दाखवून वसुलीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी होत्या. आता नव्या अन्न सुरक्षा मोहिमेचा आणि तुकाराम मुंढे यांच्या नावाचा आधार घेत पैशांच्या वसुलीसाठी दबाव टाकला जात असल्याचे आरोप केले जात आहेत. विशेषतः नाशिक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारवाईचा धाक दाखवून स्थानिक स्तरावर सध्या जोरात वसुली केली जात असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

प्रामाणिक व्यावसायिकांना त्रास नको

मात्र, व्यावसायिकांच्या आरोपांबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तसेच या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. भीतीपोटी अनेक व्यावसायिक उघडपणे बोलण्यास तयार नसल्याचे सांगितले जात असून, काहींनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अन्न सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि कारवाई प्रक्रियेत पारदर्शकता राखणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत व्यावसायिक व ग्राहक संघटनांकडून व्यक्त केले जात आहे. ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करताना प्रामाणिक व्यावसायिकांना अनावश्यक त्रास होणार नाही आणि गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles