Home नाशिक बडगुजर-शहाणेंमध्ये प्रभाग समितीच्या सभेत वाद; नाशिकमध्ये ‘लज्जास्पद’ राजकारण, महिला नगरसेविकांसमोर आई-बहिणीवरुन शिवीगाळ

बडगुजर-शहाणेंमध्ये प्रभाग समितीच्या सभेत वाद; नाशिकमध्ये ‘लज्जास्पद’ राजकारण, महिला नगरसेविकांसमोर आई-बहिणीवरुन शिवीगाळ

0

नाशिक प्रतिनिधी

राजकारणात आता नीतीमत्ता, तत्वनिष्ठता, पक्षनिष्ठता, आचार-विचार या सर्व बाबी खुंटीला टांगल्या गेल्या असून कोणालाच त्याविषयी काहीही देणेघेणे नसल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. नाशिकसह जिल्ह्यातील राजकारणही त्यापासून दूर नाही. त्यामुळेच कालपर्यंत दुसऱ्या पक्षात असताना त्यांची भ्रष्टाचार, गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर काढण्याचे तसेच देशद्रोही ठरविण्यापर्यंत मजल गेलेल्यांना आपल्याच पक्षात सन्मानपूर्वक प्रवेश देण्यात राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना काहीही वाटेनासे झाले आहे. याचा परिणाम जो होणे अपेक्षितआहे, तोच होत आहे. लोकप्रतिनिधींकडून लोकशाहीचे ओंगळवाणे दर्शन घडविले जात आहे. महापालिकेच्या नवीन नाशिक प्रभाग समितीच्या बैठकीत भाजपचे नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आपल्यातील लज्जास्पद राजकारणाचे दर्शन घडविले. आणि सर्व नाशिककरांच्या माना खाली गेल्या. नवीन नाशिक प्रभाग समितीच्या बैठकीत हा प्रकार घडला. सिडको परिसरातील दूषित पाण्याचा विषय चर्चेत आला. महिला नगरसेविका साधना मटाले यांनी दुषित पाण्याची बाटली आपल्याबरोबर आणली. सभापती बाळकृष्ण शिरसाट यांनी निवेदन खुर्चीत बसूनच स्वीकारावे, असा सल्ला अपक्ष नगरसेवक शहाणे यांनी सभापतींना दिला. त्यावरुन भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि शहाणे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. दोन्ही लोकप्रतिनिधींमधील शाब्दिक वाद चांगलाच चिघळला. बडगुजर आणि शहाणे यांच्यात महापालिका निवडणुकीपासून वाद आहेत. त्यामुळे त्याचे पडसाद वारंवार हे दोन्ही नगरसेवक जेव्हां समोरासमोर येतात, तेव्हा पडत असतात. प्रभाग समिती बैठकीत मात्र दोन्ही नगरसेवकांनी आपण किती असभ्य आहोत, हे दाखविण्याची जणूकाही स्पर्धाच सुरु केली. वैयक्तिक आरोपांमध्ये आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली. एकमेकांच्या आईबहिणींचा उध्दार करण्यात आला. हे करताना सभागृहात अनेक महिला नगरसेविका उपस्थित असल्याचे भानही बडगुजर आणि शहाणे यांना राहिले नाही. आपण जनतेचे प्रतिनिधित्व करणारे लोकसेवक आहोत, हे विसरून दोन्ही लोकप्रतिनिधींनी अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारणाचे दर्शन घडविले. इतर काही नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण शांत झाले. काही काळ प्रभाग समितीच्या बैठकीतील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. नंतर बडगुजर आणि शहाणे यांनी सभागृहाची आणि उपस्थित सदस्यांची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली. परंतु, नाशिककरांपुढे अशा असभ्य लोकप्रतिनिधींना निवडून देण्यात आपणही तितकेच दोषी आहोत, अशी अपरादपणाची भावना या प्रकारामुळे निर्माण झाली आहे. या दोन्ही लोकप्रतिनिधींवर कारवाई होणे आवश्यक आहे. परंतु, तसे होईलच याची हमी नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Exit mobile version