Home नाशिक असे हल्ले होणार तर कर्मचारी सुरक्षित कसे राहणार?

असे हल्ले होणार तर कर्मचारी सुरक्षित कसे राहणार?

0

 तहसीलदारांवरील हल्ल्यानंतर नाशिक महसूल प्रशासन संतप्त !

 

नाशिक प्रतिनिधी

येवला तालुक्यातील पारेगाव येथे अवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेले निवासी नायब तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांवर तस्करांनी केलेल्या जिवघेण्या हल्ल्यामुळे महसूल प्रशासनातून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत यातील मुख्य सूत्रधार आणि संशयितांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या नाशिक शाखेने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. गेल्या शनिवारी येवला तालुक्यातील पारेगाव येथील तळ्यात हल्ल्याची ही घटना घडली होती. या ठिकाणी अवैध मुरूम उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे हे ग्राम महसूल अधिकारी संतोष आठवले व वाहनचालक वैभव भड यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. अवैध उत्खनन करणाऱ्या डंपर चालकाकडे व संबंधितांकडे परवान्याची मागी केली असता त्यांनी कोणतीही कागदपत्रे दाखवली नाही. उलट महसूल पथकाशी हुज्जत घातली. अरेरावीची भाषा केली व शासकीय कामात अडथळा निर्माण ळकेला. नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना खाली पाडून बेदम मारहाण केली. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याकडे तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने लक्ष वेधले आहे. यामुळे महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या नाशिक शाखेने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.या घटनेची जिल्हाधिकारी व पोलिसांनी गंभीर दखल घेण्याची आवश्यकता संघटनेने मांडली. महसूल अधिकाऱ्यांवर दिवसाढवळ्या असे जीवघेणे हल्ले हे अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे संपूर्ण महसूल प्रशासनाचे मनोधैर्य खचत आहे. बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन रोखून अधिकारी शासनाचा महसूल वाचवतात. त्यांच्यावर असे हल्ले होणार असतील तर महसूल अधिकारी व कर्मचारी सुरक्षितपणे काम कसे करतील, असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला. येवला शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आणि संशयितांना तातडीने अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी पवन दत्ता, संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब तांबे, सह अध्यक्ष कुंदन हिरे, सचिव डॉ. मिलींद कुलकर्णी, शाम वाडकर, डॉ. अमित पवार, आबा महाजन, कैलास चावडे, उषाराणी देवगुणे आदींनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Exit mobile version