नाशिक प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सर्वच जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत या सर्वांना धक्का देत अपक्ष गोकुळ गिते हे नाशिक मतदारसंघातून विजयी झाले. त्यांचा हा विजय महायुतीत भाजप आणि शिवसेनेत आलबेल नसल्याचे ठसठशीतपणे दाखविणारा ठरला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून महायुतीच्या सर्व मंत्र्यांना पुरुन उरणारे गोकुळ गिते हे आहेत तरी कोण, अशीच चर्चा सध्या सर्वत्र आहे. महायुतीकडून नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला सुटली. शिंदे गटाने नरेंद्र दराडे यांना रिंगणात उतरविले. दुसरीकडे, शिवसेनेच्या ठाकरे गटाने उमेदवारच न दिल्याने अपक्ष गोकुळ गिते आणि भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे हे मैदानात राहिले. महायुतीच्याअनेक बड्या नेत्यांनी आटोकाट प्रयत्न करूनही अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. गोकुळ गिते यांची बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या काही मिनिटांत राज्याच्या वरिष्ठ पातळीवरून जोरकस प्रयत्न करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट गोकुळ गिते यांचे बंधू भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्याशी जवळीक असलेले निलेश बोरा यांना फोन लावून परिस्थितीचा आढावा घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही गणेश गिते यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. मात्र, शेवटपर्यंत गोकुळ गिते यांचे मन वळविण्यात कोणालाच यश आले नाही. अखेर अर्ज माघारीची मुदत उलटल्यानंतर गोकुळ गिते यांनी आपण थांबत असून प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले. परंतु, त्यांचे नाव मतपत्रिकेवर कायम राहिले. त्यातच खासदार फोडाफोडीमुळे डिवचलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाने प्रबळ अपक्ष उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे गटाला जी भीती वाटत होती, ती अखेर मतमोजणीनंतर खरी ठरल्याचे उघड झाले. गोकुळ गिते हे नाशिक महापालिकेतील माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपचे नेते गणेश गिते यांचे भाऊ आहेत. गणेश गिते यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत गोकुळ गिते यांनी पडद्याआडूनच भूमिका बजावली. त्यामुळे गणेश गिते यांच्या आजपर्यंतच्या यशात गोकुळ गिते यांचा मोठा वाटा आहे. मागील विधानसभा निवडणुकीत गणेश गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. या संपूर्ण निवडणुकीचे नियोजन आणि प्रचाराची बाजू गोकुळ गिते यांनीच सांभाळली होती. गोकुळ गिते हे पिंपळगाव बसवंत बाजार समितीवर सलग दोन वेळा संचालक म्हणून निवडून आले आहेत, निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सायखेडा गटातून निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी सुरु केली होती. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांची एकूण संपत्ती सुमारे २५ कोटी रुपये. तर गोकुळ गिते यांची संपत्ती १०९ कोटी रुपये. दराडे यांच्यापेक्षा गिते यांची संपत्ती कितीतरी पटीने अधिक. विद्यमान लोकप्रतिनिधी निष्क्रिय असल्यामुळे मतदारच मला निवडणूक लढण्यासाठी सांगत आहेत. नेत्यांचा मान राखण्यासाठी मी फार तर घरात बसू शकतो, पण दराडे यांना अजिबात पाठिंबा देऊ शकत नाही, असे गोकुळ गिते यांनी सांगितले होते.
