Home नाशिक तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश; नाशिकमधील गुटखा जप्तीप्रकरणी ‘मकोका’ लागणार?

तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश; नाशिकमधील गुटखा जप्तीप्रकरणी ‘मकोका’ लागणार?

0

नाशिक प्रतिनिधी

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळल्यापासून राज्यात गुटखा विक्रेते, भेसळखोरांविरोधात धडक कारवाई सुरू आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात राज्यात ठिकठिकाणी छापे टाकून प्रतिबंधित गुटखा आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थ यांची छाननी केली जात आहे. या अंतर्गत नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरात एका गोदामात छापा टाकून तब्बल साडेसात लाख रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आला. सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या गुटखा, तंबाखू व निकोटीनयुक्त पानमसाला यांसारख्या प्रतिबंधित वस्तुंचे उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्रीवर बंदी असतानाही काही ठिकाणी संघटीत स्वरुपात अवैध व्यापार सुरू असल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकरणात केवळ किरकोळ विक्रेत्यावर नव्हे तर, पुरवठा साखळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) लागू करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. नाशिकमधील कारवाईनंतर सर्व नियमांच्या अधिन राहून मकोका तरतूदी लागू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे या विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कारवाईत जप्त केलेल्या गुटख्याची निर्मिती बड्या उद्योग समूहाशी संबंधित असल्याचा संशय आहे. त्यांच्यासह पुरवठा साखळीतील सर्व घटकांवर देखील मकोका अंतर्गत कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे, सह आयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने म्हसरूळ परिसरातील गणेश शेटे यांच्या गोदामावर छापा टाकला. या ठिकाणी राज्यात प्रतिबंधित माणिकचंद गुटख्याच्या सात लाख २० हजार आणि प्रिमियम राजश्री पानमसाला गुटख्याचा ३५ हजार असा एकूण सात लाख ५५ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा केल्या प्रकरणी शेटे यांच्याविरुध्द म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी संकेत पी. येलमामे (नाशिक), गुप्तवार्ता विभागाचे ए. आर. दाभाडे, एस. एस. रांजिण, एस. मंडलिक, जी. कासार आदी सहभागी झाले. या कारवाईने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कारवाईचे सत्र सुरू आहे. प्रतिबंधित खाद्य पदार्थाची साठवणूक केल्या प्रकरणी शहरात तीन व्यापाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. मांडसांगवी, कुंदेवाडीसह अन्य भागात चिक्की, सोयाबीन तेल, पान शॉप, किराणा व जनरल स्टोअर्स आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले. नागरीक तसेच ग्राहकांची काही तक्रार असल्यास १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन सह आयुक्त दि. ज्ञा. तांबोळी यांनी केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Exit mobile version