Home नाशिक “द्राक्षबागेवर रात्रीचा राक्षशी हल्ला; ९०० झाडांची कत्तल, शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख!”

“द्राक्षबागेवर रात्रीचा राक्षशी हल्ला; ९०० झाडांची कत्तल, शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख!”

0

निफाडमध्ये संतापजनक प्रकार – मोटार चोरी, पाणी व्यवस्था उद्ध्वस्त; आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी

निफाड प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून शेतकऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी संतापजनक घटना समोर आली आहे.निफाड तालुक्यातील सावरगाव शिवारातील शेतकरी शंकर साहेबराव कुशारे यांच्या द्राक्षबागेवर अज्ञात इसमांनी रात्रीच्या अंधारात थेट हल्ला चढवत सुमारे ८०० ते ९०० द्राक्षांची झाडे धारदार हत्याराने तोडून टाकली. या निर्दयी कृत्यामुळे शेतकऱ्याच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीची अक्षरशः राख झाली आहे. या घटनेत केवळ बागेची नासधूस करूनच आरोपी थांबले नाहीत, तर शेतातील दोन बोअरवेलची वायर आणि पाईप तोडून मोटार चोरी करून नेली. यासोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करण्यात आली. त्यामुळे हा प्रकार केवळ चोरीपुरता मर्यादित नसून शेतकऱ्याच्या उपजीविकेवर थेट घाला घालणारा आणि जीविताला धोका निर्माण करणारा असल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेमुळे शंकर कुशारे यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे. “आमच्या घामाची, कष्टाची अशी निर्दयपणे नासधूस करणाऱ्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे,” अशी आक्रोशपूर्ण मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक न झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
ही घटना केवळ एका शेतकऱ्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण कृषी व्यवस्थेला हादरवणारा इशारा आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.शेतकऱ्याच्या घामाची किंमत उरली आहे का? की गुन्हेगारांसमोर व्यवस्था गुडघे टेकली आहे?

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Exit mobile version