Home नाशिक ‘नवरी’ नटली अन् दोनच दिवसात सटकली

‘नवरी’ नटली अन् दोनच दिवसात सटकली

0

कोपरगाव तालुक्यातील लुटेरी दुल्हन टोळीचा पर्दाफाश

नाशिक प्रतिनिधी 

लग्नाचे स्वप्न उराशी बाळगून बोहल्यावर चढलेल्या एका तरुणाचा संसार सुरू होण्यापूर्वीच मोडला. जेव्हा लग्नानंतर अवघ्या दोनच दिवसांत नवरीने घरून पोबारा केला. कोपरगाव तालुक्यातील रवंदा येथील एका तरुणाची लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपये आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह फसवणूक करणार्‍या ‘लुटेरी दुल्हन’ टोळीचा कोपरगाव तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नाशिकमधील एका महिलेसह दोन तरुणींना शिताफीने अटक केली असून टोळीतील अन्य तीन आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवंदा येथील फिर्यादी तरुणाला आरोपींनी संगनमत करून लग्नाचे आमिष दाखवले होते. या बदल्यात संशयितांनी फिर्यादीकडून 2 लाख 29 हजार रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू उकळल्या. 21 सप्टेंबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हा सर्व बनाव रचण्यात आला. मोठ्या उत्साहात लग्न पार पडले, मात्र नवरी घरी आल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाली. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फसवणूक झालेल्या तरुणाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी 18 फेब्रुवारी 2026 रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कलम 318(4), 316(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरली. आरोपींचा माग काढत पोलीस पथक नाशिकच्या जत्रा चौक आडगाव नाका परिसरात पोहोचले. तेथे शिताफीने सापळा रचून कशीष सुकदेव भालेराव, नम्रता सुकदेव भालेराव आणि भुमी किरण निकम (सर्व रा. नाशिक) या तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून कोठडीदरम्यान आरोपींनी संगनमताने खोटे लग्न लावून फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यातील रोख रक्कम आणि दागिने हस्तगत केले आहेत. या गुन्ह्यात आंगणगाव (ता. येवला) येथील अशोक तान्हाजी काळे, वनिता अशोक काळे आणि नाशिकचा गोकुळ चिंदा पानकर हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस आणि श्रीरामपूर मोबाईल सेलच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पोलिसांच्या या कामगिरीचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत असून अशा फसव्या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Exit mobile version