Home नाशिक एकनाथ शिंदेंनी दर्शन घेतलेल्या मंदिराचा अध्यक्ष स्वयंघोषित ‘कॅप्टन’पोलिसांच्या ताब्यात

एकनाथ शिंदेंनी दर्शन घेतलेल्या मंदिराचा अध्यक्ष स्वयंघोषित ‘कॅप्टन’पोलिसांच्या ताब्यात

0

राज्यातले अनेक मातब्बर नेते व सेलिब्रिटींशी संबंध… जप्त केलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये 58 आक्षेपार्य व्हिडिओ

नाशिक प्रतिनिधी 

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांसह इतरांनी ज्याच्या मंदिरात हजेरी लावली आहे, अशा सिन्नर तालुक्यातील अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ यास एका बलात्कार प्रकरणात बुधवारी पहाटे नाशिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले आहेत. अशोक खरात हा भविष्य सांगत असल्याने त्याच्याकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून काही विधीच्या नावाखाली तक्रारदाराचा विश्वास संपादन करून त्याने संबंधित महिलेला ऑफिसमध्ये बोलवित गुंगीकारक पदार्थ खायला दिल्यानंतर अत्याचार केल्याचे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे. २०२२ पासून डिसेंबर २०२५ पर्यंत हा प्रकार सुरू होता, असे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी संशयित अशोक खरातविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे. याअंतर्गत बुधवारी पहाटे गुन्हे शाखेने त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ असून प्रसिध्द महिला, सेलिब्रिटी संदर्भात काही व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येते, पोलीस तपासात अजूनही काही आक्षेपार्ह गोष्टी पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव हे छोटेसे गाव आहे. या गावातील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. श्री शिवलिका संस्थानची त्याने स्थापना केली आहे, या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर असल्याचे सांगितले जाते. खरात अंकशास्त्रज्ञ जाणून आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरात भेट दिल्यानंतर अशोक खरात अधिक चर्चेत आला. कॅप्टन अशोक खरात हा मर्चेंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. खरातने ‘कॉस्मॉलॉजी’ (विश्वशास्त्र) नावाच्या विज्ञान शाखेचा अभ्यास केला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधिताला कठोर शिक्षा करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकणकर यांना पदावरुन हटविण्याची मागणी केली आहे. खरात यांच्याविरुध्द याआधी एक प्रकरण दाबण्यात आले होते, असा आरोपही त्यांनी केला आहे. खरात यास अटक करण्यात आल्याने त्याने याआधी अत्याचार केलेल्या इतरही महिला पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सुषमा अंधारेंनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

 

“कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली. खरात याच्यावर बलात्कार योन शोषण यासारखे आरोप आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे. हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर, तटकरे, चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे. अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणे, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याचे लोक चर्चा करत आहेत. विशेष यापूर्वी सुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता. विशेष खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात याच्या घरच्या लग्न कार्यामध्ये चाकणकर जातीने आवभागत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते. आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे, पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रूपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार ? योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी विराजित आहेत. महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा लिंग पिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे?” असे अंधारेंनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

फिर्यादीत काय?

 

स्वतःला कॅप्टन म्हणून घेणाऱ्या अशोक खरात याच्याविरोधात देण्यात आलेल्या फिर्यादीत महिलेने म्हटले की, स्वतः कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली मनात विश्वास संपादन केला. यानंतर त्याने ऑफिसमध्ये बोलावून गुंगीकारक पदार्थ खायला देऊन अत्याचार केला. २०२२ पासून डिसेंबर २०२५ पर्यंत हा प्रकार सुरू होता, असे तिने फिर्यादीत नमूद केले आहे.

 

कॅप्टन अशोक खरात कोण आहे?

 

कॅप्टन खरात हे मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहेत. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये २२ वर्षांची कारकीर्द पूर्ण करताना कॅप्टन खरात यांनी १५४ देशांचे दौरे पूर्ण केले आहेत. त्यामुळे, या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नीतिमूल्ये, प्रगती, मागासलेपणा आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला असावा, असे मानले जाते. कॅप्टन खरातने आपले लक्ष ‘कॉस्मॉलॉजी’ (विश्वशास्त्र) नावाच्या विज्ञानशाखेच्या अभ्यासाकडे वळवले, तेव्हापासून त्याच्या आयुष्याला रंजक वळण मिळाल्याचे सांगितले जाते. कॉस्मॉलॉजीने गेल्या १०० वर्षांत प्रचंड प्रगती साधली आहे. कॅप्टन खरात यांनी कॉस्मॉलॉजीचे शिक्षण आपल्या या क्षेत्रातील गुरू, कै. श्री. मुजुमदार साहेब, जे त्यावेळी ‘ऑस्ट्रेलियन मर्चंट शिपिंग विभागा’चे ‘सेलिंग विभाग प्रमुख’ आणि ‘स्वाक्षरी अधिकारी’ होते यांच्या विशेष आग्रहास्तव घेतले. आपल्या प्रशिक्षण काळात एकूण २७७ विद्यार्थ्यांमधून त्यांनी सुवर्णपदक पटकावले. मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर, कॅप्टन खरात सध्या ‘शिवनिका ट्रस्ट’चे नेतृत्व करत आहेत. तसेच त्यांनी विश्व शास्त्राच्या क्षेत्रालाच आपली पुढील कारकीर्द म्हणून पुढे चालू ठेवल्याचे बोलले जाते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Exit mobile version