Home नाशिक न्यायाचे गणेश पर्व गाजवणाऱ्या सर्वसामान्यांच्या तारणहाराला हार्दिक शुभेच्छा

न्यायाचे गणेश पर्व गाजवणाऱ्या सर्वसामान्यांच्या तारणहाराला हार्दिक शुभेच्छा

0

नाशिक प्रतिनिधी

आदिवासी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या नंदुरबार या जिल्ह्याच्या ठिकाणचे भूमिपुत्र. चार भाऊ, आई, वडील अशा मोठ्या कुटुंबात जन्म घेऊन कला शाखेत पदवीधर होत उत्कृष्ट धावपटू म्हणून अनेक स्पर्धांमध्ये बाजी मारणाऱ्या, उत्तुंग व सदाबहार व्यक्तिमत्व म्हणून नावारूपाला आलेल्या या तरुणाला खाकी वर्दीविषयी आकर्षण निर्माण झाले. २०१० साली या उमद्या तरुणाने पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पोलीस सेवेचा नागपूर शहरातून श्रीगणेशा करत आपले मनात बाळगलेले स्वप्न पूर्ण केले. अशा या तरुणाचे नाव गणेश चंद्रकांत गुरव. खाकी वर्दी घालण्याचे स्वप्न पूर्ण झाले; पण सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी वाढली. कारण समाजात अन्याय झालेल्या व्यक्ती किंवा समूहाला खाकी अर्थात पोलीस प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा असते आणि ही जबाबदारी भविष्यात ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीद वाक्यानुसार पेलावी लागते. २०१० ते २०१६ पर्यंत नागपूर शहरात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाला न्याय देत कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांची उकल करणे, संवेदनशील गुन्ह्यांवर कठोर कारवाई, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक रोखणे, समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस मित्र म्हणून वातावरण निर्माण करणे अशा विविध जबाबदाऱ्यांचा श्रीगणेशा आपल्या पहिल्या कार्यकाळात नागपूर येथे गुरव यांनी केला. याचे बक्षीस म्हणून त्यांना बढती मिळून नागपूर येथेच एमआयडीसी पोलीस ठाण्यात तपास अधिकारी म्हणून पद मिळाले. २०१६ मध्ये परत एकदा बढती मिळत सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर नाशिक ग्रामीण येथे सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली. संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या मालेगाव शहरातील रमजानपुर पालीस ठाण्यात प्रभारीअधिकारी म्हणून काम करत असताना गोवंश तस्करी, कत्तलखाने प्रकारांवर व्यापक मोहीम राबवत अनेक गोडाऊन उद्ध्वस्त करून मोठ्या प्रमाणावर गोवंश जनावरे कत्तलीपासून रोखण्यात यश मिळविले. तस्करीची गुन्हेगारी साखळी पूर्णपणे विस्कळीत करून गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून सर्वसामान्य नागरिकांचा तारणहार बनत सर्वसामान्य नागरिकांचा हक्काचा अधिकारी म्हणून गणेश गुरव यांनी ओळख निर्माण केली. यामुळेच ग्रामीण नागरिकांशी सलोखा जपणाऱ्या या अधिकाऱ्यास जायखेडा व वडनेर भैरव पोलीस ठाण्यात काही काळ सेवा देण्याचा योग आला. यात उल्लेखनीय बाब म्हणजे दीड कोटी रुपयांची द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करत शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. शेतकरीहित व सुरक्षेला प्राधान्य देत आपल्या ‘सिंघमगिरी’ कारभारातून जनतेचा अधिकारी झालेल्या गुरव यांच्या कार्याची दखल तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर व नामदार दादासाहेब भुसे यांनी घेऊन त्यांचा विशेष सन्मान केला होता. याच कारणास्तव देशात कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाड शहरातील मुख्य पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी मिळाली. ‘ते आले, त्यांनी पाहिले व निफाडकरांना जिंकले’ असेच कार्यगत एक ते दीड वर्षापासून पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी निफाड पोलीस प्रशासनाचा कारभार स्वीकारण्यापासून केले आहे. पोलीस ठाण्यात प्रलंबित नोंदणी व समाजासाठी घातक ठरणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत करून निफाड शहरासह पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांना लक्ष्य करून गुन्हेगारीत लक्षणीय घट गुरव यांच्या काळात होत आहे. महिला अर्थात स्त्री शक्तीचा सन्मान होण्यासाठी शाळा, कॉलेजेस, गर्दीच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित भावना निर्माण होण्यासाठी निफाड पोलीस ठाण्यात दामिनी पथकाची स्थापना करून श्रीगणेशा करण्यात आला. तसेच शाळा, कॉलेज, एस. टी. स्थानक येथे सतत पोलीस वाहनातून गस्त ठेवून खिसेकापू व टवाळखोर गुन्हेगारांवर वचक निर्माण केल्याने शहरात नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना जागृत झाली. अनेक दशकांपासून जुन्या इमारतीत व अनेक ठिकाणी विखुरलेल्या निफाड पोलीस प्रशासकीय कार्यालयाचे १० वर्षापासून भिजत घोंगडे पडले होते. कार्यतत्पर पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी नूतन इमारतीत पोलीस ठाणे स्थलांतरित होण्यासाठी प्रलंबित कामाच्या बाबत तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा, तत्कालीन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, निफाड आमदार दिलीपराव बनकर यांच्याकडे पाठपुरावा करून नवीन अद्ययावत पोलीस कार्यालय स्थलांतरित करण्यात यश मिळविले. पोलीस प्रशासनाला एकाच छताखाली सुसज्ज कार्यालयात काम करण्याची संधी गुरव यांच्या अथक प्रयत्नातून प्राप्त झाली. तसेच, नवनियुक्त पोलीस कार्यालयाच्या समोरील अनेक वर्षांपासून असलेली अतिक्रमणे हटवून पोलीस कार्यालयाच्या समोरील व अंतर्गत भाग मोकळा करत पोलीस ठाण्याचे रूपडे बदलण्याचा श्रीगणेशा गुरव यांच्या काळात मैलाचा दगड ठरणार आहे. हसतमुख व्यक्तिमत्व असलेल्या; परंतु करारी व गुन्हेगारांवर पकड निर्माण केलेल्या गणेश गुरव या अधिकाऱ्याने शिस्तबद्ध, धाडसी आणि परिणामकारक कार्यपद्धती अवलंबित जनहित व सार्वजनिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राजकीय, सामाजिक, पोलीस प्रशासनातील दबावातही शांत, स्थिर आणि निर्णयक्षम नेतृत्वाचा संगम राखला. तळागाळातील लोकांशी संवाद व जनसंपर्क समाजहितासाठी दृढ बांधीलकी जपणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याने खाकीतील दर्दी संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून निफाडकरांच्या मनात दृढ स्थान निर्माण केले. म्हणूनच या मित्राला वाढदिवसानिमित्त अनंत कोटी शुभेच्छा!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Exit mobile version