Home Uncategorized *आदिवासी समाजात वाघदेवतेच्या पूजेसह धिंडवाळीची परंपरा कायम:*

*आदिवासी समाजात वाघदेवतेच्या पूजेसह धिंडवाळीची परंपरा कायम:*

0

आदिवासी समाजात वाघदेवतेच्या पूजेसह धिंडवाळीची परंपरा कायम

अभोणा प्रतिनिधी :डोंगरदऱ्यांतील निसर्गपूजक आदिवासी समाज आजही आपली संस्कृती, परंपरा आणि रूढी जपून ठेवण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.या आदिवासी समाजाचा मुख्य व्यवसाय शेती, शेतमजुरी आणि पशुपालन हा असून, गायी-गुरे, शेळ्या हे त्यांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. आदिवासी समाजात गायी-गुरांना ‘लक्ष्मी’चे स्वरूप मानले जाते. प्रत्येक वर्षी वसुबारसच्या दिवशी आदिवासी समाजात ‘वाघबारस’ साजरी केली जाते. या दिवशी सर्वप्रथम वाघदेवतेची पूजा केली जाते आणि नंतर गायी-गुरांची पूजा करून त्यांना तुपाचा दिवा दाखविला जातो. या पूजेमागील उद्देश म्हणजे जंगलातील हिंस्र पशूपासून गायी-गुरांचे रक्षण व्हावे हा आहे.दिवाळीची सुरुवातच आदिवासी समाजात वाघदेवतेच्या पूजेनं होते. दिवाळीच्या पाच दिवस आधीपासूनच आदिवासी बांधवांची दिवाळी साजरी होऊ लागते. गावातील गुराखी एकत्र येऊन भोपळ्यापासून तयार केलेल्या तेलाच्या दिव्याला मोळ व झेंडूच्या फुलांनी सजवतात. या दिव्याला “धिंडवाळीचा दिवा” म्हटले जाते.यानंतर हे गुराखी गावागावात, शहरी भागातील घराघरात जाऊन धिंडवाळीची गाणी गातात. ते घरात व गोठ्यात जाऊन गोमूत्र शिंपडून पवित्र करतात आणि धिंडवाळीचा दिवा ओवाळतात. यावेळी महिला दिव्याला तेल वाहतात, तसेच गुराख्यांना भात, नागली, तांदूळ आणि अन्नधान्य देतात. अलीकडील काळात फराळ व रोख पैसे देण्याची प्रथा देखील आहे.धिंडवाळी मागण्याचा उद्देश म्हणजे लक्ष्मीची कृपा लाभावी, सुख-समृद्धी यावी आणि पूर्वजांची परंपरा अबाधित राहावी हा आहे. आजही शहरात स्थलांतरित झालेल्या अनेक आदिवासी बांधवांनी ही परंपरा जोपासलेली आहे. दिवाळी संपल्यावर या गुराख्यांकडून एकत्रित केलेले धान्य व तेल वापरून सर्वजण मिळून वनभोजन करतात.आदिवासी समाजाची ही ‘धिंडवाळी’ परंपरा केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून निसर्ग, संस्कृती आणि सामूहिक ऐक्याचे दर्शन घडवणारी आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Exit mobile version